भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची पत्रकार परिषद
धाराशिव- कौडगाव एमआयडीसी येथे लॉजिस्टिक पार्क उभारण्याच्या मागणीवरून भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत धाराशिवचे आमदार आणि खासदार यांच्यावर सडकून टीका केली आहे. आमदार पाटील आणि खासदार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कौडगाव येथे लॉजिस्टिक पार्क उभारण्याची मागणी केली होती. या मागणीचे विकासाच्या दृष्टीने भाजपाने स्वागत केले असले तरी, निवडलेले ठिकाण चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी आक्षेप नोंदवला. पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्यासह नितीन काळे, संताजी चालुक्य, ॲड. अनिल काळे, सतीश दंडनाईक, युवा मोर्चाचे राजसिंहा राजेनिंबाळकर आणि अमित शिंदे हे उपस्थित होते. दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले की, लॉजिस्टिक पार्कची मागणी स्वागतार्ह आहे, परंतु त्यामागील अभ्यासाचा खुलासा करणे आवश्यक आहे. तसेच, नितीन काळे यांनी स्पष्ट केले की, रेल्वे, महामार्ग, बंदर किंवा विमानतळासारख्या वाहतूक सुविधा सहज उपलब्ध असलेल्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क उभारणे योग्य ठरते. तसेच कौडगाव एमआयडीसी ही जागा टेक्निकल टेक्सटाईल हबसाठी नियोजित असून, मागील महिन्यात 449 एकरसाठी टेंडर काढले गेले आहे. तसेच, 17 कोटींची विकासकामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत कौडगाव येथे लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा आग्रह हास्यास्पद असल्याचे नितीन काळे यांनी म्हटले. याबरोबरच वडगाव एमआयडीसी आणि म्हाळुंब्रा येथे लॉजिस्टिक पार्कसाठी योग्य भौगोलिक आणि वाहतूक सुविधा उपलब्ध असल्याचे नमूद केले. चेन्नई-सूरत महामार्ग म्हाळुंब्राजवळून जात असतानाही कौडगावचा आग्रह धरला जाणे संशयास्पद असल्याची टीका नितीन काळे यांनी केली. तर दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी पुढे सांगितले की, लॉजिस्टिक पार्कला विरोध नाही, परंतु कौडगावच्या सुसंगततेचा शास्त्रशुद्ध अभ्यास आवश्यक आहे. मागण्या संवादातून आणि तर्कसंगत असाव्यात, अन्यथा त्या दिशाभूल करणाऱ्या ठरतील. कौडगाव हे ठिकाण तांत्रिकदृष्ट्या लॉजिस्टिक पार्कसाठी योग्य नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.