नळदुर्ग शहर आणि परिसरातील वाढती लोकसंख्या त्याचबरोबर विजेची वाढती मागणी ध्यानात घेऊन दर्जेदार सेवा या भागातील नागरिकांना मिळाव्यात यासाठी महावितरणच्या स्वतंत्र उपविभागीय कार्यालयाची मागणी आपण केली होती. महायुती सरकारने आपल्या मागणीला पाठबळ देत नळदुर्ग येथे विद्युत वितरण विभागाचे उपविभागीय कार्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे नळदुर्ग येथे अपर तहसील कार्यालयापाठोपाठ आता महावितरणचे उपविभागीय कार्यालय सुरू होणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
सोलापूर – हैदराबाद महामार्गावरील ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून नळदुर्ग शहराला विशेष महत्त्व आहे. येथील भुईकोट किल्ला हा राज्यातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला आहे. त्यामुळे देशभरातून याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या अलीकडच्या काळात वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून स्थानिकांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपले नियोजनबध्द काम सुरू आहे. त्यासाठी या परिसरात पायाभूत सोयी सुविधा उभारणीला आपण प्राधान्य देत आहोत. या सगळ्या एकत्रित प्रयत्नांचा भाग म्हणूनच विजेची वाढती मागणी, ग्राहकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या दर्जेदार सुविधा आणि वितरणाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नळदुर्ग येथे महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय स्थापन करण्यात यावे, अशी मागणी आपण आग्रहाने लावून धरली होती. त्याला आपल्या महायुती सरकारने आता मंजुरी दिली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
या नव्या कार्यालयामुळे नळदुर्ग शहरासह परिसरातील गावांना वीज पुरवठा, नवीन जोडणी, दुरुस्ती- देखभाल, त्याचबरोबर तक्रार निवारण आदी सेवा स्थानिक पातळीवर तातडीने उपलब्ध होतील. यामुळे नागरिकांना तुळजापूर किंवा इतर ठिकाणी जावे लागणार नाही. नवीन उपविभागीय कार्यालय कार्यान्वित झाल्यानंतर वीज संबंधित तक्रारींचे जलद निराकरण होईल, नवीन कनेक्शन व मीटरिंगची प्रक्रिया गतीमान होईल, शेतकरी, उद्योगधंदे आणि घरगुती ग्राहकांसाठी थेट संपर्क सुविधा उपलब्ध होतील. बऱ्याच कालावधीपासून ही मागणी प्रलंबित होती. नळदुर्ग आणि परिसरातील पायाभूत सोयी सुविधा विकसित करण्यासाठी आपण सुरू केलेल्या पाठपुराव्याला यानिमित्ताने आणखी एक यश मिळाले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.