राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. गेल्या काही काळात मंत्री गिरीश महाजन यांच्यावर वारंवार टीका करणाऱ्या खडसेंविरोधात भाजप आमदारांनी जळगावमध्ये एकत्र येत पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसेंवर गंभीर आरोप केले होते. आता या आरोपांना खडसेंनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे.
खडसे म्हणाले, “मला आनंद झाला असता, जर ही पत्रकार परिषद शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीसारख्या मुद्द्यांवर झाली असती. मात्र नाथाभाऊंना टार्गेट करण्यासाठीच आमदारांना आणि मंत्र्यांना एकत्र बोलावावं लागलं, हे दुर्दैवी आहे. त्यांच्या या मजुरीला मी समजू शकतो.”
पुढे बोलताना त्यांनी भाजप आमदारांवर अप्रत्यक्ष टोला लगावला. “जे आमदार आज आहेत, ते मीच घडवलेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल फार बोलण्याची मला गरज वाटत नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
मंगेश चव्हाण यांनी केलेल्या चारित्र्यावरच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना खडसे म्हणाले, “मी 1980 पासून सक्रिय राजकारणात आहे. गेली 45 वर्षे मी जनतेची सेवा करत आलोय. गिरीश महाजन हे आज अर्ध्या खात्याचे मंत्री आहेत, तर मी एकेकाळी 12 खात्यांचा कॅबिनेट मंत्री होतो. त्यांना आजवर पूर्ण खातंही मिळालेलं नाही,” असा थेट घणाघातही त्यांनी केला.