सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग लगत आयुर्वेदीक महाविद्यालय लगत पाठीमागे ५०० खाटांच्या नवीन अद्यावत जिल्हा रुग्णालयास महायुती सरकारने मंजुरी दिली होती. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून ३२६ कोटी रुपये निधीस मान्यता देण्यात आली आहे. रुग्णालयाच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. अद्ययावत अशा सर्व सोयी सुविधांनी युक्त असे हे नवीन जिल्हा रुग्णालय असणार आहे. पुढील ३० महिन्यांच्या आत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. त्यानुसार कामाचा दर्जा आणि गुणवत्ता राखून निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या असल्याची माहिती ‘मित्र’चे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर मंजूर करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून अगदी काही अंतरावरच नवीन ५०० खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय उभारले जात आहे. रुग्णालयाच्या बांधकामास सुरुवातही झाली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिववासियांच्या आरोग्य सेवेसाठी साकारल्या जात असलेल्या या कामाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चौहान, नितीन काळे, सतीश दंडनाईक, अमित शिंदे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, कार्यकारी अभियंता श्री.बंडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
५०० खाटांच्या नवीन शासकीय रुग्णालय इमारतीचे एकूण बांधकाम ६५,९६९ चौरस मीटर असणार आहे. यामध्ये १२५ आय.सी.यु. बेड उपलब्ध असणार आहेत. या नवीन जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी वेगवेगळे शस्त्रक्रियागर उभारण्यात येणार आहेत. एकूण ०५ शस्त्रक्रिया कक्ष याठिकाणी असणार आहे. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी बांधवांसाठी सुसज्ज अशी निवासस्थानेही याच परिसरात असणार आहेत. या नवीन इमारतीमध्ये रुग्णांना अद्यावत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्राधान्याने भर देण्यात आला आहे. वैद्यकीय संकुलाचा एकात्मिक विकास करत असताना पुढे आलेल्या अडचणींवर चर्चा करून मार्ग काढले जात आहेत. संकुलाच्या अगदी मधोमध येत असलेला १८ मीटर रुंद सार्वजनिक रस्ता बाजूने काढून देण्याबाबत देखील नगर रचना विभागाच्या पुणे व छत्रपती संभाजी नगर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दुरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता यांना याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. रुग्णालयासाठी देण्यात आलेली जमीन चढ-उताराची आहे. त्यामुळेही काही अडचणी निर्माण होत आहेत. त्यावर मात करण्यासाठी आवश्यक त्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तसेच इमारतीच्या दर्शनीय भागात सुधारणा व इतर काही अनुषंगिक बदल सुचविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वृक्ष लागवड व परिसराच्या सौंदर्यीकरणावर विशेष लक्ष देण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.