उमरगा आणि लोहारा या दोन तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. खरीप हंगाम 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या एकूण 79,880 शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 86 कोटी 43 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठा न्याय मिळाल्याची भावना आणि समाधान व्यक्त होत आहे.
खरीप हंगामात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतातील उभं पीक पूर्णपणे वाया गेलं. अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले होते. ही परिस्थिती ओळखून शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी तात्काळ प्रशासनिक स्तरावर कार्यवाही सुरू करत, सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय ठेवत मदतीच्या प्रस्तावांतील त्रुटी दुरुस्त करून योग्य अहवाल सादर करण्यासाठी प्रयत्न केले.
या प्रयत्नांना अखेर यश आले असून, राज्य शासनाने 29 जुलै 2025 रोजी अधिकृत शासन निर्णय काढून ही आर्थिक मदत मंजूर केली आहे. यामध्ये उमरगा-लोहारा तालुक्यातील चारही महसूल मंडळातील 30,652 शेतकऱ्यांना 33 कोटी 70 लाखांची तर उमरगा तालुक्यातील 49,228 शेतकऱ्यांना 52 कोटी 75 लाखांची मदत वितरीत होणार आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे ही मदत मिळाल्याबद्दल शेतकरी वर्गातून त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
या निर्णयामुळे शासनाचा शेतकऱ्यांप्रती असलेला सकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचेही शेतकऱ्यांकडून आभार मानले जात आहेत.